Ad will apear here
Next
दत्ता वाळवेकर, अॅड. उज्ज्वल निकम, पं. रामदास पळसुले, पं. धुंडिराजशास्त्री दाते, भीमराव पांचाळे


‘मास्टर दत्ता’ या नावाने संगीत क्षेत्रात ओळखले जाणारे जुन्या पिढीतील भावगीत गायक दत्ता वाळवेकर, प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम, तबलावादक पं. रामदास पळसुले, पंचांगकर्ते पं. धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते आणि गजलनवाज़ भीमराव पांचाळे यांचा ३० मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
दत्ता वाळवेकर
३० मार्च १९२८ रोजी बेळगावात दत्ता वाळवेकर यांचा जन्म झाला. दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते, तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकारसुद्धा होते. १९४८च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळ्यामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी युद्धाच्या सावल्या, लग्नाची बेडी अशा नाटकांतून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरुवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. 

गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९मध्ये काढली होती. अत्यंत शुद्ध शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव अशा वेळी वाटवे, नावडीकर आणि दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावांत आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले. नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी पुष्पविण कल्पतरू हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. 

खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले क्षात्र बोली हे पुस्तकही गाजले. १९७६मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली. पुणे साहित्य संमेलनात, तसेच कराड नाट्य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. दत्ता वाळवेकर यांचे निधन १६ मार्च २०१० रोजी झाले. त्यांच्याविषयी अधिक माहिती http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आहे.
 ............


अॅड. उज्ज्वल निकम
३० मार्च १९५३ रोजी मालेगाव येथे अॅड. उज्ज्वल निकम यांचा जन्म झाला. आजपर्यंत त्यांना १६८ देशातील पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना व्हायचे होते डॉक्टर; पण झाले वकील. आपली कारकीर्द त्यांनी सुरू केली जळगाव न्यायालयात व पुढे झाले सरकारी वकील. सरकारी वकील या नात्याने ते कायमच काम करत राहिले. उज्ज्वल निकम यांचे वडील देवरावजी निकम मालेगाव येथील प्रसिद्ध वकील होते. उज्ज्वल निकम यांनी आपले बीएससीचे शिक्षण पूर्ण झाल्यानतर जळगाव येथे वकिलीची पदवी मिळवली आणि जिल्हा न्यायालयात आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. त्यांची ओळख क्रिमिनल लॉयर म्हणून आहे. 

विशेष सरकारी वकील पदावर निकम यांची नियुक्ती झाली आणि मुंबई-जळगाव असा प्रवास सुरु झाला. ते सोमवार ते शुक्रवार आपली ड्युटी मुंबई येथे पूर्ण करायचे आणि शनिवार व रविवारी जळगावला येत असत. १९८९मध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली. त्यांचा पहिला गाजलेला खटला म्हणजे इंदुबाई खून प्रकरण होय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील पदावर नेमणूक झाली. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची ही सुरुवात होती. १४ वर्षे चाललेल्या या खटल्यात १२९ आरोपींपैकी १०० जण दोषी ठरले. प्रत्येक खटल्याच्या मुळाशी जाऊन काम करण्याची सवय आणि भक्कम पोलिस तपास यामुळे त्यांना प्रत्येक खटल्यात यश मिळत गेले. 

कोर्टात नेहमी मोठमोठे युक्तिवाद करण्याकरिता उज्ज्वल निकम प्रसिद्ध आहेतच, ते एक शीघ्रकवीसुद्धा आहेत. कोर्टात त्यांनी केलेली शेरोशायरी किंवा चारोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. उज्ज्वल निकम यांच्याकडे भारतातील हाय प्रोफाइल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्ज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. 

भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक लवकरच तयार करण्यात येणार आहे.
.......


पं. रामदास पळसुले
३० मार्च १९६३ रोजी पुण्यात पं. रामदास पळसुले यांचा जन्म झाला. रामदास पळसुले यांचे वडील डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले हे संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक, संस्कृत कवी, नाटककार होते. ते पुणे विद्यापीठात संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वैनायकम हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्याला बिर्ला फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, कालिदास पुरस्कार, दालमिया पुरस्कार, वाचस्पती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. रामदास पळसुले यांची आजी शांताबाई गोखले या कीर्तनकार होत्या. त्यांची बहीण प्रियंवदा नवाथे आणि मावशी रंजना देवल या शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत असताना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पळसुले यांना तबलावादनात रस निर्माण झाला. 

रामदास पळसुले यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झाले. रामदास पळसुले यांचे तबल्याचे सुरुवातीचे शिक्षण पंडित जी. एल. सामंत यांच्याकडे झाले. वयाच्या आठव्या वर्षी सामंत गुरुजींच्या साठाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुण्यातील भरत नाट्यमंदिर येथे त्यांनी तबलावादन केले होते. त्यांनी १९८४मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. महाविद्यालयात शिकत असताना स्नेहसंमेलन, फिरोदिया करंडक स्पर्धा अशा निमित्ताने त्यांचे तबलावादन सुरू होते. या काळात त्यांनी विजय कोपरकर, धनंजय दैठणकर, अरविंद थत्ते, सुभाष कामत अशा कलाकारांना साथ केली. त्या काळात त्यांना सच्चिदानंद फडके आणि आनंद बदामीकर यांचे मार्गदर्शन मिळाले. 

अभियंता झाल्यावर त्यांनी काही काळ केएसबी पंप्स या कंपनीत नोकरी केली. पुढे त्यांनी नोकरी सोडून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने १९८६ ते १९८९ या काळात तबलावादनाचे शिक्षण घेतले. एकल तबला वादनाच्या कार्यक्रमांच्या बरोबरच पळसुले गायन, वादन आणि नृत्यासाठी तबल्याची साथ करतात. त्यांनी भारतातील, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक गायक कलाकारांबरोबर अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांचे दौरे केले आहेत. त्यांनी अनेक वादकांनासुद्धा तबल्याची साथ केली आहे. 

पंडिता रोहिणी भाटे, शमा भाटे, शाश्वती सेन, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, उल्हास कशाळकर, उस्ताद शाहीद परवेझ, पंडित विश्वमोहन भट, तरुण भट्टाचार्य, पंडिता एन. राजम, पंडित रोणू मुजुमदार, पंडित पूर्वायन चॅटर्जी, पंडिता मालिनी राजूरकर, पद्मा देशपांडे, पंडिता वीणा सहस्रबुद्धे यांच्यासारख्या अनेक कलाकारांना त्यांनी मैफलीत साथ केली आहे. ते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अनेक वर्षे अनेक गायकांना तबल्याची साथ करत आले आहेत. 

स्वतःच्या तबला वादनाच्या कार्यक्रमांच्या बरोबरच ते नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना तबलावादन शिकवतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ते गुरू म्हणून काम करतात. पळसुले यांनी शिरीष कौलगुड, अनिता संजीव आणि श्रीकांत शिरोळकर यांच्यासह २०१६मध्ये ‘आवर्तन’ गुरुकुलाची स्थापना केली. तिथे अनेक विद्यार्थी तबलावादन, पखवाज वादन, नृत्य, शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतात. या गुरुकुलामध्ये तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित रामदास पळसुले, गुरू शमा भाटे, गुरू सुचेता भिडे चापेकर, पंडित उदय भवाळकर, पंडित उल्हास कशाळकर हे गुरुजन अध्यापन करतात.
..........
पं. धुंडिराजशास्त्री दाते
३० मार्च १९२१ रोजी पं. धुंडिराजशास्त्री दाते यांचा जन्म झाला. भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजे पंचांगाची परंपरा. पंचांग म्हटले, की पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते दाते पंचांगाचे. १९०६मध्ये लोकमान्य टिळकांनी ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे. पंचांगातील गणित आकाशात दिसले पाहिजे,’ असे वक्तव्य ज्योतिष परिषदेत केले होते.

त्या काळी पंचांगामध्ये एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता होती. गणित एकच असताना फरक का, या जिज्ञासेपोटी लक्ष्मण गोपाळ ऊर्फ नाना दाते यांनी पंचांगाचे गणित तयार करून शके १८३८ म्हणजे १९१६-१७ या वर्षी पहिले दाते पंचांग प्रसिद्ध केले. १९४६-४७ पासून धुंडिराजशास्त्री दाते हे आपल्या वडिलांच्या पंचांगाच्या कामात पूर्णपणे मदत करू लागले. दाते पंचांगाचे रूपांतर वृक्षामध्ये होण्यासाठी अण्णा दाते यांचे योगदान फार मोलाचे ठरले. दिवसेंदिवस पंचांगाचा खप वाढत चालला आणि ज्योतिषांना व पंचांगाचा अभ्यास करणाऱ्यांना दाते पंचांग हे ‘रेफरन्स बुक’ म्हणून उपयोगी पडू लागले. 

महाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले. तसेच, भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगाच्या मराठी आवृत्तीचे कामही दाते पंचांगाकडे आले. आणीबाणीला विरोध केल्यामुळे धुंडिराजशास्त्री दाते यांना नाशिकच्या तुरुंगात ठेवले होते. ते भारत सरकारच्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर काम करायचे आणि भारत सरकारचे कॅलेंडर काढण्याची जबाबदारी अण्णांवर होती. ते तुरुंगात असल्यामुळे १९७६-७७ला पंचांग निघणे अशक्य होते. भारत सरकारचेही कॅलेंडर प्रसिद्ध होऊ शकत नव्हते. त्या वेळी सरकारने नाशिक तुरुंगात राहून कॅलेंडरचे काम करण्याची विशेष परवानगी दिली अन् दाते पंचांग, सरकारी कॅलेंडर प्रसिद्ध झाले. 

‘जन्मभूमी’ या गुजराथी पंचांगाचे धर्मशास्त्र व मुहूर्ताचे काम आजही दाते पंचांगकर्ते यांच्याकडून केले जाते. दाते पंचांगाची कीर्ती सर्व देशभर होऊ लागली आणि दाते पंचांग मराठी भाषेत असले तरी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि परदेशांतसुद्धा मराठी भाषक असलेला माणूस दाते पंचांग घेऊ लागला. याशिवाय, अण्णा दाते हे पंचांग, धर्मशास्त्र या विषयांवर गावोगावी व्याख्याने देत असत. व्याख्यानाच्या शेवटच्या दिवशी शंकासमाधानाचा कार्यक्रम असे. त्यामुळे वक्ता व श्रोते यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असे. शंकासमाधानाच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पंचांगातसुद्धा शंकासमाधान सदर सुरू केल्याने ज्योतिषांबरोबर सर्वसामान्यांनासुद्धा दाते पंचांगाबाबत जवळीक निर्माण झाली आणि दाते पंचांगाचे संवर्धन होण्यास मदत झाली. 

पंचांगाच्या कामात अण्णांना त्यांचे लहान भाऊ श्रीधरपंत यांचे मोलाचे साह्य होते. आजही महाराष्ट्रात आठ-१0 पंचांगे आहेत; परंतु लोकांना नेमके काय हवे आहे ते जाणून तशा प्रकारच्या सुधारणा पंचांगात वेळोवेळी करण्याकडे श्रीधरपंत दाते यांचा कटाक्ष होता. त्यामुळे दाते पंचांगाने आपले वेगळेपण जनमानसात ठसविले. धुंडिराजशास्त्री दाते यांचे निधन १८ एप्रिल १९९५ रोजी झाले. (माहिती संदर्भ : विजय जकातदार)
.............
भीमराव पांचाळे
३० मार्च १९५१ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे येथे भीमराव पांचाळे यांचा जन्म झाला. अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून भीमराव पांचाळे यांनी नऊ वर्षे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य, तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. 

भीमराव पांचाळे यांची गाण्याची पद्धत आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. मराठी गझलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गझलसागर संमेलने आणि गझल कार्यशाळा आयोजित करत असतात.

माहिती संकलन : संजीव वेलणकर 







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZLJCK
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language